पाटणा – देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करताना दिसतायेत. सुरुवातीला आवाक्यात असलेल्या कोरोना विषाणूने आता प्रसाराचा वेग वाढवला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये अधिकाधिक वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज बिहारच्या प्रधान सचिवांनी एन ९५ मास्क व पीपीई सुट्सच्या उपलब्धतेबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना प्रधान सचिव सतीश कुमार यांनी राज्यामध्ये एन ९५ मास्क व पीपीई सुटचा तुटवडा असल्याचे स्पष्ट केले असून केंद्राकडूनही आवश्यक पीपीई सुट्सचा अत्यल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगितले.
प्रधान सचिव सतीश कुमार यांनी याबाबत बोलताना, “बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ मास्क व पीपीई सुट्सचा तुटवडा आहे. बिहारने केंद्राकडे ५ लाख पीपीई (व्यक्तिगत सुरक्षा किट) सूट्सची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राकडून बिहारला केवळ ४ हजार पीपीई देण्यात आले. आज आम्हाला आणखी १५ हजार पीपीई मिळणार असून आम्ही केंद्र सरकार व खासजी पीपीई सूट्स निर्मात्यांच्या संपर्कात आहोत.” अशी माहिती दिली.
यावेळी बोलताना त्यांनी राज्यामध्ये सध्या मरकजच्या दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेल्या ३२ जणांचा शोध लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं देखील सांगितलं. देशामध्ये कोरोनाचे संकट असताना देखील दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या हा कार्यक्रम देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बिहारच्या प्रधान सचिवांनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या पीपीई सूट्स व एन-९५ मास्कचा बिहारमध्ये तुटवडा असल्याचे स्पष्ट केल्याने कोरोनाग्रस्तांचा उपचार करणाऱ्या बिहार येथील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हि निश्चितच चिंतेची बाब मानली जात आहे.
Trying to trace 32 attendees of Markaz. There is insufficiency of Personal Protective Equipment (PPEs) & N95 masks. In touch with Center & other agencies for supply. Receiving 15,000 PPEs today. Requested Center for 5 lakh PPEs, received 4,000 only: Principal Secy, Bihar #COVID19 pic.twitter.com/OQLTqLjfAn
— ANI (@ANI) April 5, 2020