पुणे : भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रभाग क्रमांक 16 – सोमवार-मंगळवार-रास्तापेठ भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वितरण करण्यात आले. नगरसेवक व पक्षाचे शहर संपर्क प्रमुख गणेश बिडकर यांच्या पुढाकाराने सदानंदनगर, भीमनगर, इंदिरानगर ,सोमवार पेठ, रास्ता पेठ या भागातील दोन हजार कुटुंबियांना अन्नधान्याच्या किटचे वितरण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्नही बिकट झालेला आहे. केंद्र सरकारतर्फे 5 किलो गहू मोफत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. गव्हाबरोबरच जे आवश्यक अन्नधान्य देणे गरजेचे आहे, ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला असल्याचे गणेश बिडकर यांनी सांगितले. साखर, तेल, तिखट, हळद, पोहे, रवा, मूग, मटकी आणि मसूर डाळ, चहा पावडर, लाईफ बॉंय साबण असा हा किट 2 हजार कुटुंबांना वितरित करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीने एका कार्यकर्त्यावर पन्नास कुटुंबियांची जबाबदारी सोपविण्यात आली.
प्रथम एक कूपन या घरांमध्ये वितरित करण्यात आले. यात कोणत्या दुकानातून वस्तू घेता येतील आणि कोणती वेळ असेल याचा तपशिल देण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही दुकानात गर्दी न होता, 2 हजार कुटुंबियांसाठी शिधा वाटप करण्यात आले. प्रभागातील भाजपाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.