48 वर्षांपुर्वी प्रभात : ता. 25, माहे सप्टेंबर, सन 1973

देशापुढील बिकट प्रश्‍न सोडविण्यासाठी आता देशात क्रांतीच झाली पाहिजे
तिरूवल्लूर, ता. 24 – संघटना कॉंग्रेसचे नेते कामराज यांनी पक्ष कार्यकर्त्यांपुढे भाषण करताना असे सांगितले की, देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे व राजकीय अप्रामाणिकपणा वाढला आहे. त्यामुळे देश अराजकाची वाटचाल करू लागला आहे अशी मला भीती वाटत आहे.

ते म्हणाले, काही राजकीय पक्ष सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा आपल्या स्वार्थासाठी करून घेत आहेत. अशा पक्षांपासून दूर राहिले पाहिजे. यापुढे देशापुढील अनेक प्रश्‍न सुटावयाचे असतील तर देशात क्रांतीच झाली पाहिजे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मागे जनतेने अशी राजकीय क्रांती यशस्वीरीत्या घडवून आणलेली आहे.

भाऊराव पाटील यांनी अस्पृश्‍यता निवारणाचा नवा मार्ग दाखविला
पुणे – कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अस्पृश्‍यता निवारण्याचा एक नवा मार्ग महाराष्ट्राला दाखविला. स्पृश्‍य, अस्पृश्‍य समाजातील अनेक जातीधर्मातील विद्यार्थीजन एका वसतिगृहात ठेवले. त्यामुळे त्यांची वसतिगृहे म्हणजे सामाजिक परिवर्तनाची केंद्रे बनली, असे उद्‌गार प्रा. मा. प. मंगुडकर यांनी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना काढले.

चिली राज्यक्रांतीत अमेरिकेचा हात नव्हता
न्यूयॉर्क – चिलीचे सत्तारूढ लष्करी प्रमुख जन. ऑगस्टो पिनोचेट युगार्ट यांनी चिलीतील राज्यक्रांतीत अमेरिकेचा हात होता या आरोपाचा साफ इन्कार केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.