“खुले’ महाविद्यालय
पुणे, दि. 12 – वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन लोणावळा येथील एका कॉलेजमधील संपावर असलेल्या प्राध्यापकांनी आजपासून कॉलेजसमोरील मोकळ्या मैदानातच कॉलेज भरवून विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली आहे. कॉलेज चालकांच्या गैरकारभाराचे कारण देऊन गेल्या 2 डिसेंबर 74 पासून प्राध्यापक मंडळी संपावर आहेत. “खुले’ कॉलेज स्थापण्याचा एक अभिनव उपक्रम म्हणून या कॉलेजचा उल्लेख करता येईल.
भारत-नेपाळ गैरसमज दूर झाले
नवी दिल्ली- भारत व नेपाळ यांचे दरम्यान जे मतभेद व गैरसमज निर्माण झाले होते ते आता दूर झाले आहेत, असे नेपाळचे पंतप्रधान नागेंद्र प्रसाद रिजाल यांनी मायदेशी परत जाताना सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी व इतर भारतीय मंत्री यांचेबरोबर माझ्या ज्या वाटाघाटी झाल्या त्या अतिशय मोकळ्या वातावरणात झाल्या.
शिवाजी मिलिटरी अकॅडमीची योजना
नागपूर – महाराष्ट्रात लष्करी शिक्षणासाठी “शिवाजी मिलिटरी अकॅडमी’ स्थापन करण्याची राज्य सरकारची योजना असून ही योजना मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती आज शिक्षणमंत्री शरद पवार यांनी विधानसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. त्याचबरोबर महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचेकडे सोपविलेले, शिवचरित्र लिहिण्याचे काम चालू आहे, अशीही माहिती ना. पवार यांनी दिली.
राज्यात 1 कोटी युनिटस्च्या बोगस शिधापत्रिका!
नागपूर – महाराष्ट्रातील एक कोटी युनिटस्च्या बोगस शिधापत्रिकांचा तपास करून त्या उजेडात आणण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येईल असे आज विधानसभेत नागरी पुरवठा मंत्री यशवंतराव मोहिते यांनी जाहीर केले.