राजगुरुनगर -जिल्ह्यात फसवणूक झालेल्या जवळपास 550 गाड्या असुन खेड पोलीस ठाण्यांतर्गत 55 गाड्या होत्या. त्यातील 48 गाड्या मिळून आल्या, दोनचा तपास केला आहे. तर उर्वरित 5 गाड्यांचा शोध सुरू आहे. यातील दोघाही आरोपींना अटक केली असून त्यांचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. अटक आरोपींना राजगुरूनगर न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीविरुद्ध भोसरी, दौंड परिसरात गुन्हे दाखल केले आहेत.
सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी, ता. खेड) व अजय लिंबाजी धुमाळ अशी आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील अनेक आलिशान चारचाकी गाड्या भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्या परस्पर विक्री किंवा गहाण ठेऊन त्याद्वारे भरमसाठ पैसे घेत गाड्या मालकांना गंडा घालण्याचा प्रकार महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता.
खेड हद्दीत 55 गाड्या गेल्याबाबत खेड पोलीस ठाण्यात अमोल भागडे (रा. पाडळी) व सुभाष सांडभोर (रा. थिगळस्थळ) यांनी 4 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यावरून सागर मोहन साबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. खेडचे निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी तपास करीत 55 पैकी 48 गाड्या हस्तगत केल्या होत्या.
(दि. 3) पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मूळ मालकांच्या स्वाधीन केल्या. सागर साबळे व साथीदार अजय लिंबाजी घुमाळ यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून नंतर ठरल्याप्रमाणे भाडे देणे बंद करून सर्व गाड्यांचा अपहार करुन फिर्यादीसह सर्वांची फसवणूक केली. दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास महिनाभर केला.
अपहार झालेल्या गाड्या आरोपी सागर साबळे व साथीदारानी माजलगाव, बीड, परभणी, पाथरी, हिंगोली, बडवनी या भागातील लोकांना बेकायदा विकल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गुन्ह्यातील एकुण 55 गाड्यांपैकी काही गाड्यांचा जीपीएसद्वारे शोध घेतला. तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक सतिषकुमार गुरव यांचे अधीपत्त्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, हवालदार संतोष घोलप, बाळकृष्ण भोईर, शेखर भोईर, सचिन जतकर, संदीप चौधरी, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, योगेश भंडारे, रमेश करंडे, संजय रेपाळे यांनी केला.
खेड तालुक्यातील अनेक होतकरू तरुणांनी कर्जावर महागड्या गाड्या घेतल्या. आमिष दाखवून या गाड्या कंपन्यांना लावल्या, यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा प्रकार झाला आहे. गाड्या भाड्याने दिल्या; यात गाडी मालकाची फसवणूक झाली. विविध ठिकाणी 6 गुन्हे दाखल झाले आहेत. मिळालेल्या गाड्या कोर्टाची प्रोसेस करून मूळ मालकांना दिल्या. यात खेड पोलिसांची मोठी कामगिरी आहे. एजंटच्या नावाने फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. आपण खातरजमा करून पुढील व्यवहार करावा.
-डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण
खेड पोलीस स्टेशन हद्दीत 55 गाड्यांबाबत फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली 55 गाड्यांचा शोध सुरु केला. परभणी, अमरावती, बीड, मुंबई आदी ठिकाणी पोलीस पथके रवाना करून 55 पैकी 48 गाड्यांचा शोध लावले आहे. उर्वरित 5 गाड्यांची माहिती मिळाली असून त्या लवकरच ताब्यात घेतल्या जातील.
-भारत भोसले, तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक