लिबियाने इजिप्तबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले
बैरुट, दि. 19 – इजिप्तचे अध्यक्ष सादत यांचा इस्रायल भेटीचा निषेध म्हणून लिबियाने इजिप्तशी असलेले राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी इजिप्तमधील सर्व लिबियन नागरिकांना मायदेशी परत बोलविले आहे.
लिबियाचे अध्यक्ष गडाफी यांनी इजिप्तला अरब राष्ट्रांचा शत्रू असे संबोधून सीरिया, इराक व अल्जिरिया येथील लिबियन वकिलांना त्या राष्ट्रांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यांची संयुक्त फळी पॅलेस्टाइनच्या मागे उभी करावी, अशी सूचना दिली आहे.
अल्पसंख्याकांना पुरेसे प्रतिनिधित्व द्या
नागपूर – आगामी विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक जमातीतील कार्यकर्त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जावे, अशी मागणी विदर्भातील प्रमुख कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. माजी आमदार माधवराव पाटील यांच्याकडे ही मागणी केली.
मूलभूत हक्क प्रदान करा
काठमांडू – जनतेला सर्व मूलभूत हक्क देण्यात यावेत अशी मागणी राजे विरेंद्र यांच्याकडे करण्यात आली. बंदी घातलेल्या राजकीय पक्षांनी बहुपक्षीय लोकशाही पद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे.