– हिमांशू
गर्दी, गर्दी आणि गर्दी. जिकडे पाहावं तिकडे गर्दी. लोकलला गर्दी, रस्त्यावर गर्दी, बाजारात गर्दी, सणासुदीच्या खरेदीला गर्दी, घरात पाहुण्यांची गर्दी. दादा-भाईंच्या बर्थडेला गर्दी, यांच्या सभांना गर्दी आणि त्यांच्याही सभांना गर्दी. यांच्या सभांची गर्दी पैसे देऊन आणलेली, त्यांच्या सभांची गर्दी उत्स्फूर्त. पण दोन्हीकडे गर्दी. सरकारी हॉस्पिटलात पेशंटची गर्दी, सलमानच्या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला गर्दी. रेशनच्या दुकानात गर्दी, पेट्रोल पंपावर गर्दी आणि फास्टॅग वगैरे कम्पल्सरी करूनसुद्धा टोलनाक्यांवर गर्दी. घरातून बाहेर पडताना गर्दी आणि घरी परततानाही गर्दी. असं वाटतं गर्दीपासून लांब कुठेतरी पळून जावं.
मग वीकेन्डला महाबळेश्वर, लोणावळ्याला जावं तर तिथेही गर्दी! गर्दी काही पाठलाग सोडत नाही. या गर्दीतले किती लोक “आपले’? हा प्रश्न मात्र प्रत्येकानं ऑप्शनला टाकलेला. आपल्या मनात किती गर्दी? याचं उत्तर कुणाला मिळत नाही… किंबहुना मिळालं तरी ऐकायचं नाहीये! कारण असल्या प्रश्नांची उत्तरं फक्त आपलं मन देऊ शकतं. मन… असा अवयव जो दिसत नाही; पण असतो.
हसतो, रडतो, तुटतो, उसवतो आणि दुखतोही! बऱ्याच वेळा आजारी पडतो; पण त्याला कुणी दवाखान्यात नेत नाही. “आज वेगळंच वाटतंय,’ असं म्हणून त्याला आपण कोपऱ्यात भिरकावून देतो. पण कुठल्याही कोपऱ्यात मन स्वस्थ बसत नाही. ते आपलं दुखणं सांगू पाहतं. दुर्लक्ष केल्यास शरीर कुरतडू लागतं.
“गर्दीतलं एकटेपण’ हेच मनाचं खरं दुखणं… सगळ्यांच्याच! “आयसोलेशन अँडलोनलीनेस’ अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेनं त्याचं वर्णन केलंय. म्हणजे समाजापासून दूर होणं, एकाकी होणं! वाढता एकाकीपणा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू लागलाय, असं लक्षात आल्यामुळे आरोग्य संघटनेनं एका आंतरराष्ट्रीय आयोगाची स्थापना केलीये. एकटेपणा ही “जागतिक आरोग्य समस्या’ असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलंय. कोविडच्या महासंसर्गापासून एकाकीपणात वाढ झाली असल्याचा निष्कर्ष संघटनेनं काढला असला, तरी त्याही पलीकडे अनेक कारणं असावीत असं ठामपणे म्हणता येतं.
काही वर्षांपूर्वी जिथं सातत्यानं कोलाहल जाणवायचा, अशा अनेक ठिकाणी आता सन्नाटा जाणवतो. गर्दी मात्र पूर्वीसारखीच दिसते. मग अचानक ही शांतता आली कुठून? डोळे उघडे ठेवून बघितलं तर कळतं, की प्रत्येकजण आपापल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलाय. एकटेपणाचं हे महत्त्वाचं कारण कुणीच फारसं गांभीर्यानं घेतलेलं दिसत नाही. मित्रमैत्रिणींबरोबर कुठे फिरायला गेलं किंवा गप्पा मारायला एकत्र जमलं, तरी अनेकांचं लक्ष मित्रापेक्षा मोबाइलकडे जास्त असतं. काही दिवसांपूर्वी लठ्ठपणा ही अशीच जागतिक समस्या मानली गेली होती. एकाकीपणाची समस्या त्याहून गंभीर आहे.
स्वतःसाठी थोडा वेळ काढून विचार केला, तर प्रत्येकाला ही समस्या जाणवेल. पण स्वतःला देण्याएवढा वेळ कुणाकडे आहे? मिळालाच वेळ तर जिममध्ये जाऊन लोक शरीर कमावतील; पण मन नावाच्या अदृश्य अवयवाचं काय? लोक एकमेकांपासून सुटे-सुटे व्हावेत, यासाठी काही शक्ती जाणीवपूर्वक प्रयत्न तर करत नाहीयेत ना? कारण एकटेपण गरजा वाढवतं आणि त्या भौतिक आनंदातून पूर्ण करण्याची धडपड केली जाते. हे सगळे आनंद शरीराला संतुष्ट करणारे असतात… मन मात्र तडफडत राहतं.