चित्रपट कायद्यात सुधारणा करू, पण…
नवी दिल्ली, 18 – चित्रपट नियंत्रणासंबंधी जो 1918चा चित्रपट नियंत्रण कायदा आहे, तो लवकरच सुधारण्यात येणार आहे, असे केंद्रीय नभोवाणी व माहिती मंत्री लालकृष्ण अडवानी यांनी सांगितले. चित्रपट नियंत्रण ही गोष्ट स्वतंत्र व लोकशाही समाजात नकोच या मागणीस अडवानींनी नकार दिला.
ते म्हणाले, लोकशाही असो वा कम्युनिस्ट असो चित्रपट प्रकाशनपूर्व नियंत्रण असतेच. चित्रपटाचा परिणाम समाजमनावर फार होतो. आता टीव्ही आहे त्याचा तर अधिकच परिणाम होतो म्हणून नियंत्रण हवेच.
अरब राष्ट्रांना नष्ट करण्याची योजना?
लंडन – अरब राष्ट्रांना नष्ट करण्यासाठी इस्रायलने एक योजना आखल्याचा आरोप इराकी पररराष्ट्रमंत्री हम्मादी यांनी केला आहे. या कामी इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे, असे सांगून डॉ. हम्मादी म्हणाले, त्यांचे दरम्यान जे मतभेद आहेत ते डावपेचांच्या बाबत आहेत, धोरणाबाबत नाहीत.
गाजर गवत नाशक औषध
पुणे- गाजर गवत नष्ट करून त्यांची वाढ खुंटविणारे वनस्पती नाशक औषध नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने (एनसीएल) शोधून काढले आहे. या गाजर गवतामुळे त्वचारोग उद्भवतो. पशूंना व पिकांनाही ते घातक ठरले आहे.