नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील कापसहेडा परिसरात एकाच इमारतीत 41 जणांना करोनाची लागण झाली आहे. दाट वस्ती असलेल्या भागात योग्य काळजी न घेतल्यास करोनाचा कसा भडका उडू शकतो, याचे हे एक धक्कादायक उदाहरण दिल्लीत पाहायला मिळाले.
दिल्लीतल्या दक्षिण पश्चिम दिल्ली परिसरातल्या कापसहेडामध्ये ज्या ठिकाणी मजूर व इतर कामगार दाटीवाटीने राहतात तिथे 18 एप्रिलला एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळला होत. त्यानंतर प्रशासनाने या परिसरातल्या लोकांची चाचणी केल्यानंतर तब्बल 41 जणांना करोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कापसहेडा हा हरियाणाला लागून असलेला भाग आहे. या परिसरात दाट वस्तीमध्ये सुमारे सव्वा लाख मजूर राहतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने एक रुग्ण सापडल्यावरच संपूर्ण परिसर सील केला होता.
आज या परिसरातल्या लोकांचे रिपोर्ट आल्यानंतर 41 जण पॉझिटिव्ह सापडल्याचे आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे. ज्या हरियाणा सीमेला लागून हा भाग आहे, तिथेही या घटनेनंतर अधिक काळजी घेतली जात आहे. दिल्लीत निजामुद्दीननंतर पुन्हा एकदा एकाच परिसरातले लोक एकाचवेळी मोठ्या संख्येने बाधित झाले आहेत. त्यामुळे आता सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत.