नवी दिल्ली – माझ्या एका मताने असा काय फरक पडणार आहे, ही विचारसरणी ज्या मतदारांची असते, त्यांनी हे जाणून घ्यावे की, प्रत्येक मतामध्ये एक आगळी शक्ती असते. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये काँग्रेसचे शंकर ध्रुव यांना जर आणखी १७ मते मिळाली असती, तर ते विजयी झाले असते. पराभवाचा हा सर्वात कमी फरक चार राज्यांतील विधानसभा जागांपैकी सर्वात विक्रमी ठरला आहे.छत्तीसगडमधील या जागेची सध्या देशभर चर्चा आहे. (4 state assembly election Result)
दुसरीकडे इंदूर-२ च्या जागेवर भाजपच्या रमेश मेंडोला यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजय हा चार राज्यांतील एकूण ६३८ जागांपैकी सर्वात मोठा विजय होता. रमेश मेंडोला यांनी काँग्रेसच्या चिंटू चौकसे यांचा १,०७,०४७ मतांनी पराभव केला. (assembly election Result 2023)
छत्तीसगडमध्ये रायपूर सिटी दक्षिण भाजपचे ब्रिजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेसचे डॉ महंत रामसुंदर दास यांचा ६७,७१९ मतांच्या फरकाने पराभव केला. राजस्थानमध्ये विद्याधर नगर जागेवर भाजपाच्या दिया कुमारी यांनी काँग्रेसचे सीताराम अग्रवाल यांचा ७१,३६८ मतांनी पराभव केला. तेलंगणमध्ये कुतुबुल्लापूर जागेवर, बीआरएसचे केपी विवेकानंद यांनी भाजपच्या कुना श्रीशैलम गौड यांचा ८५,५७६ मतांच्या फरकाने पराभव केला. (Congress vs bjp)
सर्वात कमी फरकाने विजय मिळवण्याच्या यादीत छत्तिसगडमध्ये भाजपच्या आशा राम नेताम यांनी कांकेर जागेवर काँग्रेसच्या शंकर ध्रुव यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव केला. मध्य प्रदेशमध्ये शाजापूरमध्ये भाजपचे अरुण भीमवाड यांनी काँग्रेसच्या हुकुमसिंह कराडा यांचा अवघ्या २८ मतांनी पराभव केला. राजस्थानमध्ये कोतपुतली जागेवर भाजपच्या हंसराज पटेल यांनी काँग्रेसच्या राजेंद्र सिंह यादव यांचा ३२१ मतांनी पराभव केला. तर तेलंगणमध्ये चेवेल्ला जागेवर बीआरएसच्या यादय्या काळे यांनी काँग्रेसच्या बीम भारत पमेना यांचा अवघ्या २६८ मतांनी पराभव केला.