RBI Action on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे तसेच बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करते. गुरुवारी (18 जानेवारी) आरबीआयने पाच सहकारी बँकांवर कारवाई करून लाखोंचा दंड ठोठावला आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा कारवाई केलेल्या बॅंकांमध्ये समावेश आहे.
50 लाखांचा दंड –
रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही आणि ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली होती. तपासणीनंतर, RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने, RBI ने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा संपूर्ण आर्थिक दंड ठोठावला आहे.
मुंबईच्या न्यू इंडिया बॅंकेला 15 लाखांचा दंड –
रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दान केलेल्या पैशात नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले की 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम नीट पाळले नाहीत. याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.
ग्राहकांवर किती परिणाम होईल?
या पाच बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा दंड बँकांच्या कामकाजाशी संबंधित कामांवर लावण्यात आला असून त्याचा त्यांच्या सेवेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहील.