नवी दिल्ली : कॅनेडियन पोलिस असल्याचे भासवून परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत 32 जणांना अटक करण्यात आली असून 55 संगणक आणि 35 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीच्या पश्चिमेकडील मोतीनगर भागात ही व्यापक कारवाई करण्यात आली.
सोशल इन्शरन्स नंबरचे उल्लंघन केल्याच्या आरोपात मदत करण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकांना लुबाडण्यासाठी फोन केले जात असल्याची माहिती शुक्रवारी (दि. 15) पोलिसांना मिळाली. याबाबत कॅनेडियन नागरिक एल्वीस हेर्नी यांनी प्रकरणात 13 हजार 500 अमेरिकन डॉलर्सला फसवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दूरसंचार विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. त्यात जस्ज्योतसिंह, सरबज्योतसिंह आणि सागर जैन हे आंतराष्ट्रीय कॉल्सवर देखरेख ठेवत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते इंटरनेटवरील व्हॉईस ओव्हर कॉलच्या सहाय्याने कॅनेडीयन पोलिस असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हे कॉलस सेंटर रात्रीच्या वेळी चालू असे. ते कॅनेडियन पोलिस असल्याचचे भासवून नागरिकांना रोबोकॉल करत असत. त्यानंतर ते त्यांना कॉल बॅक करा अथवा अटक करण्याची धमकी देत असत. त्यानंतर त्यांना या प्रकरणी रक्कम भरून अटक टाळण्याची संधी असल्याचे सांगून फसवणूक करत. बिटकॉईन, एटीएम अथवा क्रेडीट कार्डने पैसड स्वीकारत,असे पोलिसांनी सांगितले.