पिंपरी – व्यसन करण्यासाठी सातत्याने पैसे मागून व मारहाण करून त्रास देणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुदुंबरे मावळ येथे घडली. विनायक निवृत्ती गाडे (वय 38, रा. सुदुंबरे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय मधू निंबळे (वय 25, रा. लोणावळा) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती आहे. आरोपी काहीही कामधंदा करत नव्हता. स्वतःची हौसमौज, चैन व व्यसनासाठी तो त्याची पत्नी फिर्यादी यांची बहीण हिच्याकडे वारंवार पैसे मागत असे. तिने पैसे न दिल्यास माहेरहून, आई वडील, भाऊ किंवा इतर नातेवाईकांकडून पैसे आणण्यास सांगत असे. पैसे न मिळाल्यास तो फिर्यादी यांच्या बहिणीला मारहाण करून शिवीगाळ करून तिचा छळ करत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या 31 वर्षीय बहिणीने 16 मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.