पुणे- पोटची मुलगी असलेली अल्पवयीन पीडित, तिची आई फितुर झाली असतानाही वैद्यकीय पुराव्यावरून बलात्कारी वडिलांना न्यायालयाने 30 वर्षे सकमजुरीची शिक्षा सुनावली. मूळचे उत्तरप्रदेश येथील असलेल्या कोंढवा खुर्द भागात राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी ही शिक्षा सुनावली. याबरोबरच त्याला 15 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
वडिलांनी पोटच्या मुलीसोबत केलेला हा घृणास्पद प्रकार आहे. या प्रकरणात कमी शिक्षा दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी केली.
जून ते ऑक्टोबर 2019 या चार महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी यामध्ये 8 साक्षीदार तपासले. वैद्यकीय पुरावा, तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांची साक्ष आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा नोंदविलेला जबाब महत्त्वाचा ठरला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार सचिन शिंदे, पोलीस शिपाई अंकुश केंगळे यांनी मदत केली.