पुणे : करोनाचे नवे बाधित दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा वेळी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, मास्क वापरा असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. पण, काही हौशी नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र रविवारी पुन्हा दिसून आले. ऐतिहासिक शनिवारवाडा पाहण्यासाठी झालेली गर्दी पाहून “करोनाचे गांभीर्य आहे का,’ असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
शहरातील करोनाग्रस्तांची संख्या वाढतीच
करोना बाधितांची संख्या 500 पार झाली असून, गेल्या 24 तासांत 634 बाधितांची नोंद झाली आहे. एवढेच नव्हे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. ही आकडेवारी अतिशय चिंताजनक असून, ही संख्या अशीच वाढत राहिली, तर दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
करोना बाधितांची संख्या गेल्या 15 दिवसांपासून वाढतच चालली असून, रविवारी ही संख्या 600 पेक्षा वर गेली असून, 634 बाधितांची नोंद झाली. तर पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 10 लाख 99 हजार 134 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली असून, त्यातील 1 लाख 97 हजार 964 एकूण बाधित असून, त्यातील 1 लाख 90 हजार 242 रुग्ण बरे झाले आहेत.
परंतु सध्या बाधितांमधील 2,896 रुग्ण ऍक्टिव्ह असून, त्यातील 164 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्याही वाढली आहे. दिवसभरात 294 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.