पुणे : धारदार हत्याराने वार करून जखमी करणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
राजेंद्र सोपान बिडकर (वय 55, रा. कोंढवे धावडे, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुरेश मारूती शिंदे (वय 50, रा. कोंढवे धावडे) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. 18 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास भैरवनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ ही घटना घडली.
घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी 2018 रोजी बिडकर हा फिर्यादींच्या घरी गेला. तेथे आरोपीने शिंदे याना शिवीगाळ करून धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते.
या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 307 (खूनाचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने भादवी कलम 326 (गंभीर मारहाण) नुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले.