मुंबईत भाजपला दणका; निवडणुकीच्या तोंडावर 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल

नवी मुंबई – करोना व्हायरसमुळे लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्या गडाला सुरुंग लावत 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते अशी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा 3 नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने भाजपला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या तीनही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले.

गणेश नाईक भाजपमध्ये दाखल झाले खरे मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय आणि सत्तेची गणिते बदलली. शिवसेनेने भाजपला बाजूला सारत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता काबीज केली.

यामुळे आता नवी मुंबईतही चित्र पालटू लागले आहे. गणेश नाईक यांच्यापासून दूर होत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत जाणे पसंत केले आहे. तसेच ही महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासमोर बालेकिल्ल्यात मोठे आव्हान उभे राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.