मुंबई – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजाविल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी राऊत यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये ईडीच्या नोटीशीवरून बंद दाराआड चर्चा झाली.
अनिल परब यांनी संजय राऊत यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. परब हे पेशाने वकील असल्याने ईडीला काय उत्तर द्यायचे? याविषयीच्या कायदेशीर बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीकडून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? त्यांना कसं सामोरे जायचे? यावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अनिल परब यांनी ईडीच्या मुद्द्यावरून राऊत यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. ईडीचे प्रकरण मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर काहीही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या कामासाठी राऊत यांना भेटायला आलो होतो, असे सांगतानाच या प्रकरणावर पक्ष म्हणून आम्ही योग्यवेळी भूमिका जाहीर करू, असे परब यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर राऊत यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर राऊत हे बॅकफूटवर असलेले पाहायला मिळाले. कालपर्यंत ईडीवर टीका करणारे राऊत आज ईडीचा आदर करत असल्याचे बोलले आहेत.