सातारा – करोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू असून जावळी तालुक्याच्या तहसीलदारांनी जावळी तालुक्यात करोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने जावळी तालुक्यातील 28 क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र करण्याबाबत प्रस्तावित केले आहे.
या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जावळी तालुक्यातील मौजे धनकवडी, निझरे, करंदी तर्फ मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कुसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी तर्फ मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बद्रुक, वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर तर्फ मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी तर्फ मेढा, सावली ही गावे व मेढा नगरपंचायत क्षेत्र या कंटेनमेंट झोनमध्ये करोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जावली तालुक्यातील वर नमूद केलेल्या क्षेत्रामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार पुढीलप्रमाणे 26 एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार मौजे धनकवडी, निझरे, करंदी तर्फ मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कुसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी तर्फ मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बुद्रुक, वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर तर्फ मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी तर्फ मेढा, सावली ही गावे व मेढा नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस दोनपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, उद्योग आदी सुरू ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील फक्त औषधे, घरगुती गॅस सिलेंडर व दूध घरपोच पुरविण्याबाबत सातारचे प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील, त्याप्रमाणे औषधे, घरगुती गॅस सिलेंडर व दुध घरपोच पुरविण्यात येतील.
या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निमशासकीय, खासगी अधिकारी- कर्मचारी वगळण्यात येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्यविषयक माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चुकीची माहिती देणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे. यापूर्वी वेगवेगळ्या विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडंर यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणाऱ्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक, दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र यांच्या वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशील नमूद करावा. पोलीस विभागाने त्यांच्याशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.