मुंबई – महाराष्ट्रातील धारावीत एका प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टम्पस घालून हत्या करण्यात आली. विमल राज नाडार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो 26 वर्षांचा होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली असून चौकशीदरम्यान दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचं नाव मालेश चिताकांडी (32) असं आहे.
कबड्डीपटू विमलचे कुटुंबीय आणि स्थानिक लोक न्यायाच्या मागणीसाठी धारावी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत आहेत.
नेमकं काय घडलं?
धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास मालेश आणि त्याचा मित्र विमल राजच्या घराबाहेर बसले होते. ते मोठ मोठ्याने बोलत होते. त्यामुळे विमल राज नाडारची झोप मोड होत होती. त्यामुळे विमल राज घराबाहेर आला व त्यांना खडसावलं. त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. विमल राज आणि मालेश मध्ये मारामारी सुरु झाली. मालेशचा मित्र आणि नाडारच्या नातेवाईकाने मध्ये पडून वाद थांबवला. त्यानंतर मालेश तिथून निघून गेला. “काही मिनिटांनी. मालेश चिताकांडी पुन्हा तिथे आला. त्याच्या हातात स्टम्प होता. त्याने थेट विमल राज नाडारच्या डोक्यात तो स्टम्प घातला. विमल राज जागीच कोसळला. मालेश त्यानंतर तिथून निघून गेला. विमल राज तिथे 5 वाजेपर्यंत पडून होता. स्थानिकांनी त्याला पाहिल्यानंतर जवळच्या सायन रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.