- स्वागताला वरूणराजाची हजेरी
- मानकऱ्यांच्या सत्कारानंतर सोहळ्याची सांगता
रामकुमार आगरवाल
देहूगाव, दि. 24 जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी 337 व्या पालखी सोहळ्याचे 35 दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी (दि.24) दुपारी पावणे तीनच्या सुमारास तीर्थक्षेत्र देहूत आगमन झाले. देहूकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे भक्तीमय आणि आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहाने स्वागत केले. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्यातील सहभागी विणेकरी, मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी यांना श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. भाविकांचेही आभार मानण्यात आल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.
पहाटे नित्यपूजेनंतर रविवारी (दि.24) पिंपरीगावातील श्री भैरवनाथ मंदीर येथून पालखी सोहळा वारकरी दिंडीकरी आणि भाविकांसह पुणे-मुंबई महामार्गावरून देहूगावाकडे मार्गस्थ झाली. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड लष्कर भागातून देहूरोड पालखी मार्गाने चिंचोली येथील शनी मंदिराजवळ आल्यानंतर अभंग आरती झाली. दरम्यान दुपारी चिंचोली येथील शनिमंदीर येथे संत तुकाराम अन्नदान मंडाळाच्या वतीने एकादशीनिमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे दुपारी पावणेतीनच्या सुमारास आगमन झाले. सविता तुपे, रामचंद्र तुपे कुटुंबियांकडून वेशीजवळ पालखीला दही भाताचे नैवद्य दाखविण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख हभप संतोष महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, विश्वस्त हभप संजय महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, संस्थानचे माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पालखीचे महाराजांच्या जन्मस्थळासमोर आरती झाली. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना एकादशीचा फराळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यंदा पालखी परत येतानादेखील नेहमीपेक्षा भाविक व वारकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.