राहू – राहू परिसरातील दहिटणे येथे शुक्रवारी (दि. 27) बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर केलेल्या हल्ल्यात 26 मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाला आहे. दहिटने गावच्या शिवारात मेंढपाळ यशवंत बोरकर व मेंढपाळ संपत थोरात यांनी आपला वाडा बसवला होता.
सकाळी दोन्ही मेंढपाळ हे मेंढ्या चरण्यासाठी माळरानावर गेले होते. परंतु लहान कोकरे वाड्यावरच जाळीत ठेवली होती. परंतु दुपारच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राण्याने त्यातील एक – एक कोकरू बाहेर घेऊन एकूण लहान मोठ्या मिळून सव्वीस कोकरांचा फडशा पडला. यामध्ये यशवंत बोरकर यांची 11 व संपत थोरात यांच्या 15 कोकरांचा समावेश आहे.घटनेची माहिती समजताच वनरक्षक शिवकुमार बोंबले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दहिटने व एकंदर राहू बेट परिसरातच मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर हा अनेक दिवसांपासून आहे. अनेकवेळा पाळीव प्राण्यावर हल्ले झाले आहेत. परंतु वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आलेले नाहीत.
मागील अनेक दिवसांपासून राहू बेट परिसरातील दहिटने, देवकरवाडी, राहू, टेळेवाडी, वडगाव बांडे, टाकळी भीमा अशा अनेक गावांत बिबट्याने शेकडो पाळीव प्राण्यांचा फडशा पडलेला आहे. परंतु भविष्यात बिबट्याने मनुष्यप्राण्यावर हल्ला होण्याची वाट न पाहता वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.