लोणी काळभोर – पत्नीच्या पहिल्या पतीच्या मुलाने दुचाकीची चावी दिली नाही. या शुल्लक कारणावरून चिडून जावून मद्यपान केलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून, पेटवून देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी 40 टक्के भाजल्याची घटना घडली. पोलिसांनी पतीस अटक केली आहे.
याप्रकरणी मीनाक्षी सोमनाथ वाघमोडे (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे (वय 40, रा. उरूळी देवाची, मंतरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. मीनाक्षी या स्वयंपाक करत असताना त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा शेखर यांस सोमनाथ याने रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीची चावी मागितली. त्याने चावी आईकडे आहे असे सांगितले. याचा राग सोमनाथला आल्याने त्याने शेखर याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
मुलास मारहाण होत आहे हे पाहून आई मध्ये आली म्हणून तिलाही मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारांस मुलगा कामाला जातो म्हणून घरातुन बाहेर पडला. काही वेळाने सोमनाथ हा घराबाहेर गेला. तो रात्री साडेनऊच्या सुमारास मद्यप्राशन करून परत आला. त्यावेळी त्यांच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली होती.
त्याने पुन्हा पत्नीस शिवीगाळ करत तुला आता मारून टाकतो असे म्हणून बाटलीतील पेट्रोल तिचे अंगावर टाकत पेटवून दिले. त्यानंतर पती दरवाज्याला बाहेरून कडी लावून पळून गेला. यामध्ये महिला 40 टक्के भाजली आहे. तिला ससून सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद हंबीर यांनी शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सोमनाथ वाघमोडे याला अटक केली आहे.