नगर – पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून आज सात व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, यात आलमगीर येथील करोनाबाधित रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे 18 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल बुधवारी (दि.29) रोजी निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित 7 व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका 31 वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा 14 दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 25 झाली आहे.
आज पुण्याहून उर्वरित सात अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आलमगीर येथील ही 31 वर्षीय व्यक्ती 5 एप्रिल रोजी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णास बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून, नगरकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे.