उपाययोजना करुनही रुग्णांची संख्या हाताबाहेर
लोणी काळभोर (वार्ताहर) – हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सोमवारी (दि. 13) दिवसभरात करोनाचे नव्याने तब्बल 24 रुग्ण आढळून आले आहेत. सोशल डिस्टन्सिंग न पाळण्याऱ्या नागरिकांबरोबरच, विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करुनही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 87 जणांचे स्वॅब (घशातील द्रव) लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून शनिवारी (दि. 11) तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. यापैकी 24 जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरातील एकाच कुटुंबातील सहाजण शनिवारी करोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. याच कुटुंबातील आणखी दोन सदस्य आजच्या यादीत करोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर फुरसुंगी हद्दीतील रहिवासी असले तरी, वावर मात्र कदमवाकवस्ती हद्दीत असलेल्या एका कुटुंबातील तिसरा साठ वर्षीय सदस्य करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे मागील तीन दिवसापासून संपूर्ण कुटुंबालाच घेरत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
या गावांत आढळले रुग्ण
हवेली तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुंजीरवाडी 6, उरुळी कांचन 5, लोणी काळभोर 4, कदमवाकवस्ती 2, मांजरी बुद्रुक 4, फुरसुंगी 1 व लोणी काळभोर रहिवासी; पण सध्या मांजरी बुद्रुक हद्दीत वास्तव्यास असेलेले दोन असे 24 रुग्ण आढळून आले.
उरुळी कांचनसह कुंजीरवाडी आघाडीवर…
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी नव्याने पाच करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 45वर पोचली आहे. मागील आठ दिवसांपासून रोजच उरुळी कांचन हद्दीत करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे पूर्व हवेलीतील करोनाचा हॉटस्पॉट म्हणून उरुळी कांचनची ओळख निर्माण झाली आहे. यात आज कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवसांत सहा रुग्ण आढळून आल्याने, कुंजीरवाडी हद्दीत पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वीसवर पोचली होती. यामुळे उरुळी कांचन पाठोपाठ कुंजीरवाडी पुन्हा आघाडीवर येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.