पुणे – जिल्ह्यातील 1 हजार 246 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 215 शाळा सोमवारी सुरू झाल्या. आठ महिन्यांनंतर विद्येच्या मंदिरात शिक्षणाचा पाठ’ सुरू झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझ आणि मास्क या करोना संरक्षक नियमांचे पालन करत 9 हजार 431 विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती लावली. ही उपस्थिती एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ 4 टक्के आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे उपस्थित होते. येत्या 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार शाळा सुरू झाल्या.
जिल्ह्यात 9 वी ते 12 वीच्या 1 हजार 246 शाळा आहेत. त्यामध्ये 11 हजार 33 शिक्षक, तर 4 हजार 821 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तर, 2 लाख 38 हजार 41 विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवशी एकूण शाळांपैकी केवळ 215 शाळा सुरू झाल्या.
तालुकानिहाय सुरू शाळांची संख्या
बारामती 3
भोर-वेल्हे 17
दौंड 6
हवेली 37
इंदापूर 33
जुन्नर 20
खेड 16
मावळ 14
मुळशी 15
पुरंदर 36
शिरूर 8
आंबेगाव 10