पालघर : मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. प्रथमच या योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे महा – मत्स्य अभियानांतर्गत सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री रूपाला बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रूपाला म्हणाले, किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बांधवांना 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मच्छीमार बांधवांनाही 7 टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा सर्व मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री रूपाला यांनी केले.
मत्स्य उत्पादन अधिक काळ टिकण्यासाठी शीतगृहाची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढच्या पिढीलासुद्धा मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंत्री रूपाला यांनी केले.