सातारा -सातारा जावली मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणून प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मतदारसंघातील चार रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी 20 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा निधी मंजूर करून घेतला आहे.
सातारा तालुक्यातील राज्य मार्ग क्रमांक 140 ते जकातवाडी ते करंडी रस्त्याची ( 1.950 कि.मी.) दर्जोन्नती करण्यसाठी 1 कोटी 61 लाख 15 हजार रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग 29 ते सांडवली रस्त्याची (9.200 कि.मी.) दर्जोन्नती करण्यसाठी 8 कोटी 74 लाख 87 हजार रुपये, तर प्रमुख जिल्हा मार्ग 29 ते वरची जगमीन रस्त्याची ( 6.200 कि.मी.) दर्जोन्नती करण्या साठी 5 कोटी 75 लाख 75 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
जावली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग 141 म्हाते बु. ते भामघर ते भोगवली ते आसणी (गाडी तळ) रस्त्याची
( 5.075 कि.मी.) दर्जोन्नती करण्यासाठी 3 कोटी 91 लाख 27 हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार त्वरित पूर्ण करून कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बाधंकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.