पिंपरी – जादा नफा मिळत असल्याच्या सातत्याने अफवा उठत असल्याने अनेक जणांचा आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, नफ्याचे पैसे बॅंक खात्यात वर्ग होत नसल्याचे प्रकार समोर आल्यामुळे फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. शहरात फसवणूक झालेल्या जवळपास 20 हून अधिक जणांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे धाव घेत तक्रारी दाखल केल्यामुळे अभासी चलनातील गुंतवणूक धोक्याची असल्याचे
स्पष्ट झाले आहे.
सुमारे 12 वर्षांपूर्वी क्रिप्टो करन्सी अस्तित्वात आली. या करन्सीला जागतिक पातळीवर पुर्वी मान्यता नव्हती. मात्र काही देशांनी या करन्सीला मान्यता दिल्यानंतर तसेच जागतिक दर्जाच्या काही कंपन्यांनी ही करन्सी स्विकारण्यास सुरुवात केल्यामुळे अचानकपणे या करन्सीचे महत्त्व वाढल्याने दरही वाढले. काही महत्त्वाच्या क्रिप्ओ करन्सीचे दर वाढल्यानंतर व त्याचा वापर वाढल्याने सातत्याने दरवाढीचे फायदेशीर गुंतवणुकीचे चित्र गुंतवणुकदारांसमोर उभे करण्यात आले होते.
त्यातूनच अनेकांनी सोने किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले. क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीबाबत मोठमोठ्या आकर्षक जाहिराती येत असल्याने गुंतवणूकदारही याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले होते. मात्र गुुंतवणुकदारांना असलेली अपुरी माहिती जागतिक पातळीवर चालणारी काही प्रमुख चलने वगळता इतर चलणामधील धोकादायक गुंतवणूक यामुळे अनेकांची फसगत झाल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या 20 हून अधिक तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
अशी होते फसवणूक
काही ठरविक क्रिप्टो करन्सीमधूनच तोही जागतिक पातळीवरच व्यवहार होत असल्याने उर्वरित संकेतस्थळावर गुंतवणूक केल्यास त्याद्वारे फसवणूकच होत आहे. सध्या फसवणूक झालेले नागरीक हे मान्यता नसलेल्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्याने फसले आहेत. मात्र गुंतवणूक करण्यास भाग पाडणारे खरी माहिती लपवून ठेवतात. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या नावे केवळ संकेतस्थळावर एक खाते तयार करून त्यामध्ये क्रिप्टो करन्सी खरेदी केल्याचे भासविले जाते. तसेच त्याची किंमतही वाढवून नफा दाखविण्यात येतो. मात्र ही गुंतवणूक काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास ही रक्कम बॅंक खात्यात वर्ग होत नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे केवळ रक्कम स्विकारून त्याद्वारे फसवणूक करण्याचेच प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अत्यंत सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
पोलिसांचे आवाहन
कोणतेही आभासी चलन खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत सर्व माहिती घ्यावी. आपण ज्या एजंटला पैसे देतो तो खात्रीचा आहे का, आपल्याला होणारा फायदा तो आपल्या बॅंक खात्यात जमा करणार का? याबाबतची खात्री झाल्यानंतरच व्यवहार करावा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
परदेशातील न्यायालयात खटला
अनेक संकेत स्थळावर क्रिप्टो करन्सीाबाबत काही वाद उद्भवल्यास ज्या संकेतस्थळावर गुंतवणूक दाखविण्यात येते, ती संकेतस्थळे भारताबाहेरून चालविली जातात. त्यामुळे त्याबाबतची तक्रार चालवावयाची झाल्यास संबंधित देशामध्ये चालवावी लागते. म्हणजेच भारताबाहेर खटला लढवावा लागतो. भारतीय नागरीक या गुंतवणुकीबाबत परदेशामध्ये खटला चाविण्याबाबत दुर्लक्ष करत असल्याने या क्रिप्टो करन्सीतून फसवणूक करणाऱ्यांचे फावत आहे.