वॉशिंग्टन – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सातत्याने नवनवीन विक्रमांची नोंद केली जात असते. आता नुकत्याच एका नव्या विक्रमाची नोंद झाली असून ज्यामध्ये फक्त दोन वर्षाच्या मुलीचा एका आयक्यु सोसायटीमध्ये समावेश करण्यात आल्याच्या विक्रमाची दखल घेण्यात आली आहे.
जगभरात सर्वात जास्त बुध्यांक म्हणजेच आयक्यु असलेल्या व्यक्तींची जी मेनसा नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये या दोन वर्षाच्या मुलीला प्रवेश देण्यात आला आहे. ती सोसायटीतील सर्वात लहान सदस्य असून म्हणूनच तिच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
इस्ला मॅकनाब असे या मुलीचे नाव असून ती क्रेस्टवूड येथे राहत आहे. तिच्या वयोगटांमध्ये तिने आयक्यु चाचणीत सर्वात जास्त म्हणजे 99% गुण मिळवल्याने तिचा समावेश या सोसायटीत करण्यात आला आहे. इस्लाच्या पालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दीड वर्षाची असल्यापासूनच तिला इंग्रजी भाषेची सर्व अक्षरे पाठ झाली होती.
तिच्या ज्ञानात सातत्याने भर पडत असल्याने जेव्हा या सोसायटीतील प्रवेशासाठी तिला परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा तिने तब्बल 99% मार्क मिळवले. या सोसायटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किमान 98 टक्के मार्क मिळवणे आवश्यक असते. मेन्सा सोसायटीची इसला सदस्य झाल्यामुळे भविष्यात तिच्या बुद्धिमत्तेला अजून आकार येऊ शकेल अशी आशा तिच्या पालकांना वाटत आहे.