काबुल : अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांवर अफगाणिस्तानच्याच सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये अमेरिकेचे 2 सैनिक ठार झाले आहेत. अमेरिकेच्या सैन्य दलाने या घटनेला पुष्टी दिली आहे.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेचे सैन्य मायदेशी परत बोलावण्यासाठी ट्रम्प प्रशासन आतुर झालेले आहे. त्याच वेळी घडलेल्या या घटनेमुळे अफगाण- अमेरिकेच्या सैन्यातच तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नानगरहार प्रांतातील शेरझाद जिल्ह्यातील तळावर ही घटना घडली. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सैन्याच्या कमांडोकडून युद्धसराव सुरू होता.
त्यावेळी अफगाणी सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये हे दोन सैनिक मरण पावले, असे अमेरिका-अफगाणी दलाचे प्रवक्ते सोनी लेगेट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या गोळीबारामध्ये अफगाणिस्तानचे तीन कमांडोही जखमी झाले आहेत, असे प्रांतीय गव्हर्नर शाह महमूद मेयाखील यांनी म्हटले आहे. हा गोळीबार जाणीवपूर्वक केला गेला की अपघाताने घडला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
कोणत्याही गटाने त्वरित या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही.