#U19CWC Final : बांगलादेश विजेता तर भारत उपविजेता

पोशेफस्ट्रूम : युवा (१९ वर्षाखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा ३ विकेटनी( डकवर्थ-लुईस नियमांनुसार) पराभव करत विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. बांगलादेशने जिंकलेला हा पहिलाच युवा विश्वचषक आहे. अकबर अली सामन्याचा मानकरी ठरला. तर भारताच्या यशस्वी जैस्वाल याला स्पर्धेचा मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

भारताने बांगलादेशसमोर १७८ धावांचे आव्हान ठेवलं होत. आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने ८.५ षटकात बिनबाद ५० अशी मजल मारली होती. पण त्यानंतर रवी बिश्नोईने ४ विकेट घेत बांगलादेशची बिनबाद ५० वरून ६ बाद १०२ अशी अवस्था केली. पण त्यानंतर कर्णधार अकबर अली आणि परवेझ हुसेन इमॉन यांनी चांगली भागीदारी रचली आणि बांगलादेशचा विजयाचा मार्ग सुकर केला. परवेझ इमॉन ४७ धावा काढून माघारी परतल्यानंतर भारताला विजयाची संधी होती. पण ४१ षटकांत ७ बाद १६३ अशी बांगलादेशची धावसंख्या असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर बांगलादेशला डकवर्थ लुईसनुसार ४६ षटकात १७० धावांच नवीन आव्हान मिळाल होत. त्यानंतर कर्णधार अकबर आणि रकीबुल हसनने सावधपणे फलंदाजी करत ४२.१ षटकात ७ बाद १७० धावा करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

बांगलादेशकडून परवेज होसैन एमनने ४७(७९), तनजीद हसनने १७(२५), अकबर अलीने नाबाद ४३(७७) आणि रकीबुल हसनने नाबाद ९ धावा केल्या. भारताकडून रवि बिश्नोईने १० षटकात ३० धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले. सुशांत मिश्राने २ तर यशस्वी जैस्वालने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ४७.२ षटकात १७७ धावसंख्येवर आटोपला. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२१ चेंडूत (८ चौकार व १ षटकार) सर्वाधिक ८८, तिलक वर्माने ६५ चेंडूत ३८ तर ध्रुव जरेलने ३८ चेंडूत २२ धावांची खेळी केली. या तीन फलंदाजांशिवाय इतर एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताचे प्रमुख फलंदाज दिव्यांश सक्सेना २, प्रियम गर्ग ८ तर सिध्देश वीर शून्यावर बाद झाला.

बांगलादेशकडून गोलंदाजीत अविषेक दास ९ षटकात ४० धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. शोरिफुल इस्लाम आणि तंजीम हसन शाकिबने प्रत्येकी २ तर रकीबुल हसनने हसनने १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.