खरीप हंगामापासून एकाच अर्जावर मिळणार सर्व योजनांचा लाभ
मुंबई : येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. ही प्रक्रिया “महाडीबीटी पोर्टल’च्या माध्यमातून ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही. अर्जावरील कार्यवाहीचे एसएमएस देखील लाभार्थ्याला पाठविले जातील. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्याने योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
“महाडीबीटी पोर्टल’ आणि “महाभूलेख’ संकेतस्थळाची जोडणी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत “सात बारा’ आणि 8-अ ही कागदपत्रे द्यावी लागणार नाही. या योजनेचे मोबाईल ऍप देखील विकसीत करावे, अशी सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
कृषी हा राज्यातला पहिला विभाग आहे जो महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देणार आहे. त्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना त्याद्वारे लाभ घेता आला पाहिजे, अशा सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.
विशेष म्हणजे या नव्या प्रणालीत शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावर त्याच्या अर्जावरील कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाईल. अर्ज करताना शेतकऱ्याला कागदपत्रे सादर करावी लागणार नाही. योजनेसाठी त्याची निवड झाल्यावर त्याच्याकडून कागदपत्रे घेतली जातील, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
दरवर्षी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही
आता एकदा अर्ज केला की परत अर्जाची गरज नाही. ही प्रणाली एखाद्या शेतकऱ्याला विशिष्ट योजनेतून त्याच्या मागणीनुसार लाभ देता येत नसेल तर अन्य दुसऱ्या कुठल्या योजनेतून देण्याची कार्यवाही करेल आणि लाभ दिला जाईल. एखाद्या वर्षी शेतकऱ्याची निवड झाली नाही तर त्याचा अर्ज बाद न होता पुढच्या वर्षासाठी तो ग्राह्य धरला जाईल. या प्रणालीद्वारे राज्यात एकाच वेळी लॉटरी पद्धतीने तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड होणार आहे. ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे अधिक गतीने शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे भुसे यांनी सांगितले.