नवी दिल्ली- बदनामीच्या एका प्रकरणात तहलका डॉट कॉमचे पत्रकार तरुण तेजपाल आणि अन्य दोघांनी याचिकाकर्त्यांना 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. लष्करातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल एमएस अहलुवालिया यांनी अब्रुनुकसानीसाठी या सर्वांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तहलका डॉट कॉमने 2001 मध्ये एक “स्टिंग ऑपरेशन’ केले होते. संरक्षण विषयक खरेदी व्यवहारांमध्ये अहलुवालिया यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप या “स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र या आरोपांमुळे अहलुवालिया यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला आणि सार्वजनिक जीवनातील त्यांची प्रतिमाही डागाळली गेली. गेल्या 23 वर्षांपासून या आरोपाखाली याचिकाकर्त्यांना रहावे लागले आहे. हे नुकसान भरून न येऊ शकणारे असल्याचा दावा न्यायालयाने मान्य केला.
लंडनस्थित कंपनी संरक्षण विषयक नवीन उपकरणे भारतीय लष्कराला विकण्यासाठी प्रयत्न करत होती. या खरेदी व्यवहारासाठी अहलुवालिया यांनी 10 लाख रुपये आणि मद्याच्या बाटलीची मागणी केल्याचे आणि अहलुवालिया यांनी 50 हजार रुपये स्विकारले असल्याचे दर्शवण्यात आले होते.
मात्र हा केवळ “स्टिंग ऑपरेशन’साठीचा बनाव होता. संबंधित वृत्त तहलका डॉक कॉमच्या दोन पत्रकारांनी केले होते. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यावर लष्कराने त्याची गंभीर दखल घेतली आणि लष्करी न्यायालयाच्या माध्यमातून चौकशीचे आदेश दिले होते.