आयात धोरणात अधिक उदारपणा
नवी दिल्ली, दि. 14 – सरकारने आयात धोरणात उदारपणा आणून त्यासंबंधीच्या कार्यपद्धतीतही सोपेपणा आणला आहे. 1976-77चे आयात धोरण आज लोकसभेत वाणिज्य मंत्री चट्टोपाध्याय यांनी जाहीर केले. “लाल फिती’चे व इतर दिरंगाईकारक अडथळ्यांचे उच्चाटन आणि परवाने देण्याच्या गतीत वाढ ही नव्या धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. निर्यात होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्यांना त्यासाठी जर यंत्रसामग्री आयात करावयाची असेल तर सवलत दिली जाणार. त्यामुळे उत्पादन वाढीस, निर्यातीस हातभार लागेल.
अलिप्ततेची तत्त्वे मवाळ करण्याचा प्रश्नच नाही
नवी दिल्ली – अलिप्तवादाची तत्त्वे मवाळ करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांनी घोषित केले. अलिप्त राष्ट्रांच्या गटात नवीन देशांना समाविष्ट करण्यासाठी जी कसोटी लावण्यात येते तिचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी आहे.
किमान वेतन कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक
नवी दिल्ली – किमान वेतन कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडले जाईल आणि कायद्यात सुधारणा करण्यात येतील, असे केंद्रीय मजूर मंत्री रेड्डी म्हणाले.