थेऊर- शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील आदित्य शरद लोंढे याची 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. पीवायसी क्लबकडून आदित्य क्रिकेट खेळत असून नुकत्याच होणाऱ्या विनू मंकड स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. आदित्य क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू आहे. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे.
मध्यमगती गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याने सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. यापूर्वी सुरेंद्र भावे व निरंजन गोडबोले यांनी त्यास मार्गदर्शन केले आहे. आदित्य कला शाखेच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत असून त्याचे आजोबांनी सीआरएफमध्ये देशसेवा केली आहे. वडील शरद लोंढे पुणे जिल्ह्यात महसूल विभागात कार्यरत आहेत.