पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने उडविलेला हाहाकार लॉकडाऊनच्या कालावधीतही कायम असून, आज एकाच दिवसात तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने 629 जणांना बाधा झाली आहे. मृतांमध्ये शहरातील 12 तर हद्दीबाहेरील 5 जणांचा समावेश असून, बाधितांमध्ये शहरातील 592 जणांचा तर बाहेरील 37 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येने 11 हजारांचा टप्पा ओलांडला असून, एकूण बाधितांची संख्या 11038 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 254 झाली आहे.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाच दिवसांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केलेला असतानाही बाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या संशयित रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 592 जणांना तर शहराबाहेरील 37 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील बारा जणांचा तर बाहेरील पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांना महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. मृतांमध्ये शहरातील दिघी, चिखली, निगडी, पिंपळे गुरव, चिंचवड, भोसरी, पिंपरी, कासारवाडी, रुपीनगर येथील रहिवाशांचा तर शहराबाहेरील चाकण, दौंड, तळेगाव दाभाडे, खडकी, शिरपूर येथील रहिवाशांचा समावेश आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आजच्या मृतांमध्ये एका 21 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 6699 तर शहराबाहेरी 260 रुग्ण कोविडमुक्त झाले असून, आज दिवसभरात 219 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 3425 रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आज नव्याने 2960 संशयित महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले असून, 872 जणांचे करोना चाचणी अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.