पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज तब्बल 159 विषयांना मंजुरी देण्यात आली. सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांच्या विकासकामांचा त्यामध्ये समावेश आहे. स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा असल्याने रात्री उशिरापर्यंत काम करत महत्त्वाच्या विषयांना मार्गी लावण्यात आले.
शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या विषयाबाबत असलेला विरोध आणि त्याबाबत उद्भवलेला वाद लक्षात घेता हा विषय सभेत दाखल करून घेतला गेला नाही. तांत्रिक मुद्यांचे कारण देत आयुक्तांनी हा प्रस्ताव मांडलाच नाही.
सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सायंकाळी साडेपाच वाजता स्थायी समिती सभा सुरू झाली, ती रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु होती. सभेसमोर 26 विषय मंजुरीसाठी होते. तर, आयत्या वेळी 134 विषय दाखल करून घेतले.
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी वाढीव 45 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. अन्य प्रस्ताव मात्र मंजूर केले. शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची वार्षिक 97 कोटी रुपये खर्च गृहित धरुन काढलेली निविदा वार्षिक 106 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याबाबतच्या वाढीव रकमेला सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता.
मात्र, सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. ही उपसूचना वाचलीच गेली नाही, असा आक्षेप भाजपच्या स्वपक्षीय नगरसेवकांनीच घेतला. तसेच, याबाबत सत्यता तपासल्याशिवाय कार्यवाही करू नका, अशी आग्रही मागणी संबंधितांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन केली.
त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव स्थायी सभेत दाखल करून घेतला जाणार होता. मात्र, आयुक्तांनी या प्रस्तावाबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे कारण दिले. त्यामुळे हा विषय सभेत दाखल करण्यात आला नाही. त्याशिवाय, खासगी वाटाघाटीचा प्रस्ताव देखील कामकाजात घेतला गेला नाही.
कामगार कल्याण मंडळाला पिंपरीतील भूखंड
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून अण्णासाहेब मगर स्टेडियम महापालिकेला हस्तांतर केलेले आहे. त्याच्या मोबदल्यात मंडळाला 1 कोटी रुपये आणि 5 भूखंड ताब्यात देण्याचे ठरविले होते.
त्यातील 1 कोटी रुपयांची रक्कम मंडळाला यापूर्वी दिलेली आहे. तसेच, महापालिकेने कामगार कल्याण मंडळाला तीन ठिकाणच्या जागांच्या मोबदल्यात चिंचवड येथील 88 हजार 560 चौरस फूट व अतिरिक्त 871.5 चौरस फूट असे एकूण 89431.5 चौरस फूट जागा यापूर्वी हस्तांतर केलेली आहे. दरम्यान, मंडळाला पिंपरी-अजमेरा कॉलनी येथील 2 लाख 5 हजार चौरस फूट इतकी जागा 30 वर्ष कालावधीसाठी देण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.