सात व्यावसायिकांच्या मालमत्तेचा होणार लिलाव

पिंपरी : (अमरसिंह भातलवंडे) खासगी मालमत्तेमधून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्यामुळे महसूल विभागाने आकारलेली दंडाची रक्‍कम न भरणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांना दंडाची रक्कम भरण्याबाबत वारंवार सूचित केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या मालमत्तेचा लिलाव करुन दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार शहरातील सात जणांच्या मालमत्तेचा मार्च महिन्यात लिलाव करण्यात येणार आहे. लिलावामधून आलेल्या रकमेतून ही दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगराध्ये अनेक ठिकाणी अवैध रित्या मुरुम, माती यासारख्या गौण खनिजाचे उत्खनन सुरु असते. महसूल विभागाने कारवाई केल्यानंतरही खनिजाचे उत्खनन थांबविले जात नाही. शिवाय आकरण्यात आलेली दंडाची रक्कमही अशा व्यावसायिकांकडून भरली जात नाही.

महसूल विभागाने गौण खनिजाचे अवैध रित्या उत्खनन करणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शिवाय अनेक वर्षांपासून दंडाची रक्कम थकवणाऱ्यावरही कारवाई करण्यात येत आहे.

त्यानुसार मे. नम्रता डेव्हलपर्स चौधरीतर्फे शैलेश कांतिलाल शहा, काळुराम रुपालाल चौधरी, समृध्दी डेव्हलपर्सतर्फे बाबुलाल चौधरी, अक्रम चौधरी, नितीन शिवराम लोंढे, निथू पिराजी शिंदे, रामचंद्र नामदेव बनकर व इतर या व्यावसायिकांवर दंड थकविल्यामुळे कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या व्यावसायिकांच्या काही विशिष्ट मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे, त्याचे सर्व्हे क्रमांकही देण्यात आले आहेत.

अवैध गौण खनिजाचे उत्खनन केल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाबाबत वारंवार नोटीस पाठवूनही व्यावसायिकांनी दंड भरला नसल्यामुळे यापूर्वीच या सात जाणांच्या सातबाऱ्यावर दंडाच्या रकमेचा बोजा आकरण्यात आला होता.

कारवाईमुळे वसुली सोपी होणार

यावर्षी पिंपरी-चिंचवड महसूल विभागाला 40 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वीच तहसीलदारांनी नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठी यांची बैठक घेऊन महसुली वसुलीच्या सूचना दिल्या होत्या. आता मार्च अखेरच्या तोंडावर अवैध गौण खनिजाची थकबाकी असणाऱ्या मालमत्तेची लिलावाची कारवाई होणार असल्यामुळे महसूल विभागाची वसुली सोपी होणार आहे.

संबंधित व्यक्तींकडे मागील काही दिवसांपासून अवैध रित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी दंडाची रक्कम थकलेली होती. या व्यक्तींना वांरवार लेखी सूचना दिल्यानंतरही ही रक्कम भरलेली नव्हती. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी संबंधित मालमत्तेचा लिलाव केला जाणार असून त्याद्वारे ही वसुली करण्यात येणार आहे.
– गीता गायकवाड, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.