एचआयव्ही बाधितांची जगण्याची उमेद वाढवण्याचा 15 वर्षांचा संघर्ष ‘पॉझिटिव्ह साथी’

जागतिक एड्‌स दिन विशेष

– अंजली खमितकर

पुणे – एचआयव्ही झाला की सगळं संपलं असं समजण्याचा खरं तर तो काळ… पण जर एचआयव्ही बाधितांचेच विवाह दुसऱ्या बाधितांशी करू दिले तर… त्यांचीही जगण्याची उमेद वाढेल… हा विचार आला आणि एचआयव्ही बाधितांची वधू-वरसूचक वेबसाइटचा जन्म झाला. ‘पॉझिटिव्हसाथी डॉट कॉम’… त्यातून अक्षरश: शेकडो विवाह जमले आणि पदरमोड करून ही वेबसाईट करणाऱ्या आवलियाचं नाव अनिल वळीव…

सख्ख्या मित्राला एचआयव्हीची बाधा झाली आणि त्याचा सखोल परिणाम वळीवांच्या मनावर झाला. त्याचा जीवनपट हेलावून टाकणारा होता. अशांसाठी काहीतरी करावे अशी तळमळ मनात निर्माण झाली आणि त्यातूनच “पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम’ या लग्न जमवणाऱ्या वेबसाइटचा जन्म झाला.

वळीव हे आरटीओमध्ये उच्चपदस्थ अधिकारी. 1995 च्या सुमाराला त्यांच्या एका जवळच्या मित्राचा एड्‌सने मृत्यू झाला. “एचआयव्ही’ झाल्यानंतर त्याला झेलावी लागलेली सामाजिक अस्पृश्‍यता त्यांनी जवळून पाहिली. कुटुंबीयांकडून मिळणारी वागणूक, त्याची आगतिकता हे त्याचं सोसणं वळीव यांनी जवळून पाहिलं. त्यातूनच 2005 मध्ये जन्म झाला अशांना मानसिक आधार देणाऱ्या पॉझिटिव्हसाथीचा. या वेबसाइटवरील रजिस्ट्रेशन “फ्री ऑफ कॉस्ट’ आहे.

दीड हजार लग्न जमली
“एखाद्याचे लग्न जमल्यानंतर वेबसाइटवरील प्रोफाइल इच्छुक स्वत: डिलीट करतात. त्यामुळे किती जणांचे लग्न जमले, याची प्रत्यक्षात “कट तू कट’ आकडेवारी नसली तरी रजिस्ट्रेशन केलेल्या पाच-सहा हजारांमधील किमान दीड हजार जणांचे लग्न जमली आहेत,’ असे वळीव यांनी सांगितले.

मला भेटल्यानंतर माझी धडपड पाहून अनेकांना प्रश्‍न पडतो, की मीही एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे का? एकांनी तर माझी एचआयव्ही टेस्टही करून पाहिल्याचे वळीव यांनी मिश्‍किलपणे सांगितले. या कामात पत्नी, मुले आणि अन्य नातलगांचीही मदत होते, असे वळीव यांनी सांगितले. 2005 पासून, मेळावे आणि वेबसाइट मेन्टेनन्सचा जवळपास 90 टक्के खर्च वळीव करतात. मेळाव्यांमधून काहीवेळाच आर्थिक मदत उपलब्ध होत असल्याचे वळीव म्हणाले.

वेबसाइटवर यांची आहे माहिती
लग्न करण्याची इच्छा असलेल्या बहुतांश एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये विदूर, विधवा, तरुण मुले-मुलांचा समावेश आहे. ज्याच्या जोडीदाराचे निधन झाले आहे किंवा हा आजार समजल्यानंतर सोडून गेले आहेत असे. याशिवाय अशा संबंधातून 25-30 वर्षांपूर्वी जन्मलेली आणि पॉझिटिव्ह असलेली मुले जी आता तारुण्यावस्थेत आहेत अशांचा यामध्ये समावेश आहे.

मेळावे अन्‌ समुपदेशनही…
20-22 वर्षांची एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले-मुलींच्या लग्नाचे प्रश्‍न बिकट आहेत, हे जाणवले. औषधांच्या आधारे सामान्य जीवन जगत असले, तरी ते सर्वसामान्यांमध्ये विशेषच ठरतात. त्यामुळे अशांचे आयुष्य बनवण्याचा विचार मनात आला आणि त्यांचे लग्न त्यांच्यासारख्याच व्यक्तीशी जमवण्याचा प्रयत्न सुरू झाला. एड्‌सग्रस्त वधू-वरांचे मेळावे आयोजित करून, त्यांचे समुपदेशनही वळीव यांनी सुरू केले. आजपर्यंत त्यांनी असे 25 मेळावे घेतले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.