चंदिगड – जर तुम्ही कोल्ड्रिंकचे झाकण दातांनी उघडण्याचा प्रयत्न केला असेल तर या पुढे करू नका. कारण पंजाबमधील अंबाला येथे कोल्ड्रिंकचे झाकण उघडत असताना झाकण श्वसननलीकेत अकडून गदमरून 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पंजाबमधील अंबाला येथील आहे. यश असे मृताचे नाव आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. तो अंबाला कॅन्टोन्मेंटमधील डिफेन्स कॉलनीतील रहिवासी आहे.
शनिवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री यशची बहीण कोल्ड्रिंकचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र कोल्ड्रिंकचे झाकण न उघडल्याने यशने दाताने झाकण उघडण्याचा प्रयत्न केला. झाकण उघडल्यानंतर ते यशच्या श्वसननलीकेत अडकले. यशच्या कुटुंबीयांनी त्या तोंडातून झाकण काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना झाकण काढता आले नाही. यानंतर यशला रुग्णालयात नेण्यात आले, बऱ्याच प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी यशच्या घशातील झाकण बाहेर काढले, मात्र त्याला वाचवता आले नाही.
मृताचे काका सुनील यांनी सांगितले की, यश हा एकुलता एक मुलगा होता, त्याला एक बहीण आहे. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डॉक्टर संजीव कौशिक यांच्या मते, कोल्ड्रिंकचे झाकण कधीही दातांनी उघडू नये. ते खूप धोकादायक आहे. पंजोखरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अजित सिंह यांनी सांगितले की, यशचा मृतदेह शुक्रवारी लष्करी हॉस्पिटलमधून पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल कॅंटमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.