पणजी – येत्या 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणाऱ्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी (Golden Peacock) चुरस आहे. चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या, कला आणि राजकारण अशा बहुसंख्य प्रचलित विषयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
इफ्फीच्या तिसऱ्या आवृत्तीपासून सुरू झालेल्या पहिल्या सुवर्णमयुर पुरस्कारापासून आजपर्यंत हा पुरस्कार आशियातील सर्वाधिक प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. या वर्षी देखील विजेते निवडण्याचे अशक्यप्राय काम सोपवलेल्या ज्युरींमध्ये इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्केल चॅव्हन्स, फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बर्चुरेन आणि आपल्या भारतातले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीचा आढावा घेतला.महोत्सवातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणांना मुरुगन यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
फिल्म बाजार आणि राज्यांची दालने यांसारख्या इफ्फीमध्ये होणार्या विविध कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या कार्यक्रम स्थळांचा केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दौरा केला. ही कार्यक्रम स्थळे अद्याप तयारीच्या विविध टप्प्यात असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. कार्यक्रम स्थळांच्या भेटीनंतर मंत्री मुरुगन यांनी 53 व्या इफ्फीच्या आयोजन आणि व्यवस्थापनामध्ये सहभागी असलेल्या विविध संस्थांसोबत बैठक घेतली.
हा महोत्सव शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने, सर्व संबंधितांना सर्वतोपरी प्रयत्न करून एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. इफ्फीला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी , निसर्गदत्त गोव्याचा आनंद आणि या महोत्सवाचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.