ला पॅराग्युआ (व्हेनेझुएला) Gold mine collapse – व्हेनेझुएलामधील एक सोन्याची खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान १४ जण ठार झाले आहेत आणि अन्य काही जण जखणी झाले आहेत.
याशिवाय आणखीन अनेक लोक या खाणीमध्ये अडकले असण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे. व्हेनेझुएलाच्या मध्यवर्ती बोलिवर प्रांतात अंगोस्तुरा महापालिकेच्या हद्दीमध्ये मंगळवारी ही दुर्घटना घडली. बुला लोका नावाच्या खाणीची भिंत कोसळली. या खाणीपर्यंत नावेच्या मदतीने तासाभराचा प्रवास केल्यानंतरच पोचता येऊ शकते.
आतापर्यंत १४ मृतदेह सापडले आहेत आणि ११ जण जखमी झाले असल्याचे या प्रांताच्या गव्हर्नरांनी सांगितले. खाणीमध्ये अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.
कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत कमागारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी निदर्शने देखील केली. व्हेनेझुएलामध्ये २०१६ पासून खाण उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या खाणींमधून सोने, हिरे, तांबे आणि अन्य खनिजांचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते.