काराकास – व्हेनेझुएलातून त्रिनिदाद आणि टोबागो इथे बोटीतून जाणारे 14 विस्थापित समुद्रामध्ये बुडाले असल्याचे आढळून आले आहे. बोटीतील 11 जणांचे मृतदेह शनिवारी समुद्रामध्ये तरंगताना आढळले.
तर रविवारी आणखीन तिघांचे मृतदेह जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले आहेत, असे व्हेनेझुएलाच्या सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विस्थापितांच्या बोटीमध्ये एकूणा किती जण होते, हे मात्र या निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले नाही.
व्हेनेझुएलातून त्रिनिदाद अणि टोबागो या देशांमध्ये विस्थापित होत असलेल्या नागरिकांची संख्या अलिकडच्या काळात वाढली आहे. व्हेनेझुएलातील परिस्थिती दिवसेदिवस अधिकच खराब होत असल्याने हे विस्थापित सागरी मार्गाने जवळच्या देशांमध्ये स्थलांतर करत आहेत.
गेल्या वर्षी अशाच प्रकारे सागरी मार्गाने त्रिनिदादला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विस्थापितांच्या दोन बोटी बुडाल्याने सुमारे 60 जण बेपत्ता झाले होते.