मुंबई – छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कि स्वराज्यरक्षक या वादावर पडदा पडलेला असताना आता भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा याबाबत भाष्य केले आहे. यावेळी नितेश राणे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. तसेच “कोल्हे हा ऍक्टर पैसे घेऊन महाराजांचे रोल करत’ असल्याचे देखील राणे यांनी यावेळी म्हंटले.
खासदार कोल्हे यांचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले, “अमोल कोल्हे नावाचा ऍक्टर पैसे घेऊन शिवाजी महाराजांचा रोल करतो तो काही फुकट करत नाही. तो नावासाठी खासदार झाला आहे 2024 ला त्याला आपटून टाकू. त्याने दाढी काढली तर त्याला कोणी ओळखणार पण नाही तो केवळ सिरीयल पुरताच आहे.” असा घणाघात नितेश राणे यांनी एका सभेदरम्यान केला.
दरम्यान, आता राणेंच्या याच टीकेवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार पलटवार केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, “कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहे? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? भाजपचं राणेंना किंमत देत नाही, बोलतांना संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा.’ असं कोल्हे म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “कला क्षेत्र हे माझ्या उत्पन्नाचं साधन आहे, मी उजळ माथ्याने सांगतो असं राणेंनी सांगावं, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही.. इतकंच काय मी सिंधुदुर्ग मध्ये नक्की कार्यक्रमाचे प्रयोग करेल, आणि राणेंनी ते आवर्जून पाहावं…’ असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.