पुणे विभागात बरे होणाऱ्यांचे प्रमाण 61.54%
पुणे – पुणे विभागातील आतापर्यंत 13 हजार 576 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोनाबाधितांची संख्या 22 हजार 59 पर्यंत पोहोचली आहे. विभागात सध्या 7 हजार 548 बाधित उपचार घेत असून, त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या आहे. विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 4.24 टक्के इतके आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 706 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 631, सातारा 14, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 बाधित सापडले आहेत. दरम्यान, विभागातील एकट्या पुणे जिल्ह्यातील 17 हजार 905 बाधित रुग्ण असून, त्यातील 10 हजार 601 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 6 हजार 664 बाधितांवर उपचार सुरू असून, एकूण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच 365 रुग्ण गंभीर आहेत. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.57 टक्के इतके आहे.