नवी दिल्ली – चीनमधील हेनान प्रांताच्या मध्यवर्ती भागातल्या एका प्राथमिक शाळेला लागलेल्या आगीमध्ये १३ बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मरण पावलेले सर्व विद्यार्थी इयत्ता तिसरीत शिकणारे होते, असे शाळेतील शिक्षिकेने सांगितले.
या आगीमधून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. या घटनेबाबत संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेनान प्रांतातल्या फॅन्गचेंग जिल्ह्यातल्या यिन्गकाय स्कूल या ग्रामीण भागातील निवासी शाळेला ही आग शुक्रवारी रात्री लागली आणि मध्यरात्रीपर्यंत या आगीने रुद्ररुप धारण केले होते.
त्यानंतर शाळेच्या प्रमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. या आगीमागील कारणांचा तपास केला जात असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.