पुणे : शहरात तसेच उपनगरांतील अनेक ठिकाणी ड्रेनेज, पावसाळी लाइनची कामे चालू आहेत. ही कामे दि. 31 मे पूर्वी करणे अपेक्षित होते. परंतु, ही कामे पूर्ण झालेली नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव रस्ता, टिळक रोड व इतर पेठेसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ड्रेनेजलाइन, पावसाळी लाइन, पाण्याची लाइन यांची कामे चालू आहेत व काही ठिकाणी कामे झाली आहेत. काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तेथील कामातील राडा-रोडा रस्त्यावर तसाच पडला आहे व खड्डे सुद्धा आहेत. यामुळे चिखल होऊन लहान-मोठे अपघात होत आहेत. या गोष्टींचा पुणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे बुजवण्यात यावेत तसेच तेथील राडारोडा उचलण्यात यावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे आणि कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस आबा बालगुडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.