नगर जिल्ह्यात अवघा 12 टक्के पाणीसाठा

पावसाने दहा-पंधरा दिवसांत हजेरी न लावल्यास पाणीसंकट अधिक गडद

नगर: मृग नक्षत्र दुसऱ्या चरणाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले तरी जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे 12 टक्के पाणीसाठा उरला असून ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाणीसंकट अधिक गडद होत चालले आहे. अर्थात धरणांमध्ये आता मृतसाठाच्यावर केवळ 907 दलघफु पाणी शिल्लक राहिले आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची धग अधिक तीव्र बनत चालली आहे. सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ठिकठिकाणी विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत तर टॅंकरने केला जाणारा पाणीपुरवठाही अपुरा ठरू लागला आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असतानाच पावसाने मात्र वक्रदृष्टी केली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप समाधानकारक पावसाची चिन्हे दिसेनात. त्यातच अजून मान्सून येऊन धडकला नसल्याने खरीपाची पेरणीही खोळंबली आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची सरासरी 103 मि.मी. इतकी आहे. परंतु दि. 1 ते 14 जून या कालावधीत गेल्यावर्षी 43.64 मि.मी म्हणजे 8.77 टक्‍के इतका पाऊस झाला होता. आतापर्यंत केवळ 28.09 मि.मी. म्हणजे 5.65 टक्के इतक्‍याच पावसाची नोंद झालेली आहे. गुरुवारी जिल्ह्यात नगर शहरामध्ये पाऊसाने जोरदार हजेरी लावली होती. उर्वरित तालुक्‍यांमध्ये गेल्या दोन ते तीन पावसापासून पाऊस पडला नाही. मात्र, अपेक्षित अशी पावसाची हजेरी नसल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठाही वेगाने घटत चालला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे 12 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने येत्या दहा-पंधरा दिवसात समाधानकारक हजेरी न लावल्यास पाणीसंकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्यापही काही तालुक्‍यातून टॅंकरची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. पावसामुळे खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये 6 हजार 213 दलघफु पाणीसाठा आहे. हा साठा मृतसाठा धरून आहे. उपयुक्‍त जलसाठा केवळ 907 दलघफु इतका आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची काय ती व्यवस्था आहे. पावसाने अजून ताणले तर 15 जुलैनंतर धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात भंडारदार, मुळा व निळवंडे हे मोठे प्रकल्प असून त्यांच्यावर जिल्ह्याची भिस्त आहे. या तीन धरणांमध्ये 5 हजार 913 दलघफु पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये आढळा, सीना, खैरी, विसापूर या प्रकल्पांमध्ये 257 दलघफु पाणीसाठा आहे. मांडओहोळ, घोड, घाडशिळ पारगाव हे मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता आता वाढू लागली आहे. मान्सून लांबल्याने धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस समाधानकारक न पडल्याने शेतीची मशागत देखील अद्याप केलेली नाही. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.


14 लाख लोकसंख्येला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 595 गावे 3 हजार 299 वाड्यांना तब्बल 857 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून 14 लाख 13 हजार 487 लोकसंख्या या टॅंकरच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहे. तालुकानिहाय टॅंकरः संगमनेर- 48 गावे, 299 वाड्यांना 72 टॅंकर. अकोले- 15 गावे, 77 वाड्या 15 टॅंकर. कोपरगाव- 11 गावे, 54 वाड्या 13 टॅंकर. राहुरी- 4 गावे, 6 वाड्या 3 टॅंकर. नेवासे- 46 गावे, 111 वाड्यांना 53. राहाता- 1 गाव, 40 वाड्या 8 टॅंकर. नगर- 43 गावे 286 वाड्या 70 टॅंकर. पारनेर- 79 गावे 508 वाड्यांना 116 टॅंकर. पाथर्डी- 113 गावे, 586 वाड्यांना 148 टॅंकर. शेवगाव- 50 गावे, 218 वाड्या 68 टॅंकर. कर्जत- 71 गावे, 458 वाड्यांना 84 टॅंकर. जामखेड- 52 गावे, 86 वाड्या 58 टॅंकर. श्रीगोंदा- 57 गावे, 502 वाड्यांना 76 टॅंकर.


नगरपालिका क्षेत्रामध्ये टॅंकर चालू
पारनेर, जामखेड, पाथर्डी, कर्जत, शेवगाव या पाच नगरपालिका क्षेत्रात सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या पाच पालिका क्षेत्रात 73 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


504 छावण्यांमध्ये 3 लाख 32 हजार जनावरे
पाणीटंचाईबरोबर चारा टंचाई निर्माण झाल्याने जानेवारीपासून जिल्ह्यात जनावरांसाठी छावण्या उभारल्या आहेत. आतापर्यंत 504 चारा छावण्या उभारण्यात आल्या असून या छावण्यांमध्ये 3 लाख 32 हजार 878 लहान मोठी जनावरे दाखल झाली आहेत. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही आपले पशुधन छावण्यांमध्ये ठेवणे पसंत केले आहे. 44 हजार 240 लहान तर 2 लाख 88 हजार 638 मोठी जनावरे दाखल झाली आहेत. या छावणी चालकांना आतापर्यंत 35 कोटी 70 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 46 कोटी 81 लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले असून त्यापैकी 35 कोटी अनुदान देण्यात आले आहे. आता 86 कोटी अनुदान उपलब्ध झाले आहे. उर्वरित अनुदानाची छावणी चालकांना प्रतीक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.