#CWC19 : रोहित-विराटने पाकिस्तानला धुतले

मॅंचेस्टर – रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने केलेल्या धडाकेबाज खेळींच्या बळावर भारताने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 336 धावांची मजल मारली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली. दुखापतग्रस्त धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या लोकेश राहुलने धोकादायक गोलंदाज मोहम्मद आमिरचे संपूर्ण षटक सावध खेळी करत निर्धाव घालवले. तर, दुसरा सलामीवीर रोहितने हसन आलीच्या षटकांत 9 धावा करत संघावर आणि राहुलवर दडपण येणार नाही याची काळजी घेतली. शिखरच्या उपस्थितीत सावध खेळी करणारा रोहित शर्मा शिखरच्या अनुपस्थितीत फटकेबाजी करताना दिसून आला.

रोहित फटकेबाजी करत होता तर राहुल एकेरी धावा करत रोहितला जास्तित वेळ स्ट्राईक देण्यासाठी प्रयत्नशील होता. यावेळी दोघांनीही भारताला पाचच्या सरासरीने धावा करून देत दहा षटकांत संघाला अर्धशतकी मजल मारुन दिली. यावेळी दोघांनीही अतिरिक्त दडपण न घेता सावध खेळी सुरुच ठेवल्याने पाकिस्तानवर दडपण आले होते. त्यामुळे त्यांचा कर्णधार सर्फराज अहमदने सहा गोलंदाज वापरुन भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहितने फिरकी गोलंदाजांना लक्ष्य करत 34 चेंडूतच आपले अर्धशतक पुर्ण करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. यावेळी दोन्ही सलामीवीरांनी भारताला 17.3 षटकांत शतकी मजल ओलांडून दिली. भारताने शतकी मजल मारल्या मारल्या राहुलने 69 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान भारतीय सलामीवीरांनी पहिल्यांदाच विश्‍वचषक स्पर्धेत पाक विरुद्ध शतकी भागीदारी नोंदवली.

यावेळी आपल्या अर्धशतकानंतर वेगाने खेळण्याच्या प्रयत्नात राहुल 57 धावा करुन परतला. बाद होण्यापूर्वी राहुलने रोहितच्या साथीत 23.5 षटकांत 136 धावांची भागीदारी नोंदवली. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला साथीत घेत रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवत 25.4 षटकांत संघाला 150 धावांची मजल मारून दिल्यानंतर रोहितने आपल्या खेळीची आक्रमकता आणखीन वाढवत 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यंदाच्या विश्‍वचषकातील त्याचे हे दुसरे शतक आहे.

शतकानंतर रोहितने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली त्याची ही फलंदाजी पाहून तो आज वनडेतील आपले चौथे द्विशतक ठोकणार असे वाटत होते. मात्र, हसन अलीला चिप शॉट मारण्याच्या नादात तो 140 धावांवर झेलबाद झाला.
रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. स्लॉग ओव्हर सुरू झाल्याने हार्दिक पांड्या मैदानात आला होता. त्यानेही फटकेबाजी करत भारताला 300 च्या जवळ पोहचवले. मात्र, आमिरला हेलिकॉप्टर शॉटवर षटकार मारण्याच्या नादात तो 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला धोनी केवळ 1 धाव करुन बाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर वर्ल्डकप पदार्पणाचा सामना खेळानारा विजय शंकर खेळण्यास आला. पावसामुळे सामना थांबला होता. मात्र, सामन्याला सुरुवात झाल्यानंतर विराट 77 धावांवर बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर शंकर आणि केदार यांनी 336 धावांची मजल मारुन दिली.

संक्षिप्त धावफलक – भारत 50 षटकांत 5 बाद 336 (रोहित शर्मा 140, विराट कोहली 77, लोकेश राहुल 57)

Leave A Reply

Your email address will not be published.